श्री स्वामी समर्थ
सर्व गुरु बंधू आणि गुरु भगिनीनो, सादर प्रणाम काल आपण प्रारब्ध हा विषय हाताळायचा प्रयत्न केला. आज कर्मयोग आणि त्याचे प्रारब्धाशी असेलेले अतूट नाते समजून घ्यायचा प्रयत्न करू या.
विषयाला हात घालण्यापूर्वी, कर्म आणि कर्मयोग म्हणजे काय हे पहावे लागेल.(प्रारब्ध म्हणजे काय हे कालच पाहिले आहे.).
कर्म:आपण जी दैनंदिन कामे (स्वतः साठी आणि दुसऱ्या साठी) करतो ती सर्व कर्म ह्या गटात मोडतात. ही कर्मे बरीच प्रकारची असू शकतात, एक तर स्वेच्छेने केलेली आणि अनिच्छेने केलेली अशी त्यांची वर्गवारी करता येईल. आणि खोलात गेल्यास, काल बघितल्याप्रमाणे, देहकर्म, व्यवसायकर्म, कर्तव्यकर्म, धर्मकर्म आणि अध्यात्मकर्म असे त्याचे पोटभाग करता येतील. आता, फळाची अपेक्षा न धरता कर्म करा असे परमार्थ सांगतो,
पण खरेच ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताला शक्य आहे का? उत्तर आहे, हो पण आणि नाही पण. त्याचे स्पष्टीकरण म्हणजे, आपण करत असलेली काही कर्मे आपण निश्चितच काही अपेक्षा न ठेवता करू शकतो. उदाहरणार्थ, आईवडीलांची सेवा, मुलांचे संगोपन इत्यादी. ह्यात प्रकर्षाने स्वामी नामस्मरण लिहिणे टाळतो आहे कारण बहुतौशी नामस्मरण हे अपेक्षा ठेऊनच केले जाते. वरवर आपली स्वामीभक्ती हे त्याचे मुख्य कारण असते ह्यात वाद नाही, पण मनात एक सुप्त अपेक्षा असते की मी एवढे स्वामी नामस्मरण करतो मग मला स्वामी त्याचे उचित फळ देवोत. आणि ते मिळाले नाही आणि संकटाचा डोलारा वाढत गेला की विश्वास डगमगू लागतो. स्वामी का माझ्याकडे लक्ष देत नाहीत, का माझी ह्यातून सुटका होत नाही, असा विचार करून मन खट्टू होते. "महाराजा! काय रे पाप केले मी,,, जे तू मला हे दिवस दाखवतो आहेस?" असे विचार येतात. ह्या सर्वांचे मूळ नामस्मरणामागची सुप्त अपेक्षाच असते. माझ्यासारखा भक्त हे चारचौघात कबुल करणार नाही पण माझे सत्य मी माझ्यापासून लपवून ठेऊ शकत नाही.
असो! तर काही कर्मे पूर्णपणे अपेक्षारहित असू शकतात आणि काही अपेक्षापूर्ण. आणि त्यात गैर असे काही नाही. काल सांगितल्याप्रमाणे व्यवसायकर्म (नौकरी) करताना पगाराची अपेक्षा नाही ठेवली तर उपाशी मरायची पाळी येईल. देहकर्म, व्यायाम करताना, शरीर निरोगी राहिले पाहिजे ही अपेक्षा असणे चुकीचे नाही. पण उरलेली तीन कर्मे नक्कीच अपेक्षाविरहित असू शकतात किंवा तसा प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही.
जेव्हा फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जाते तेव्हा साधकाचे लक्ष आपल्या कर्मापेक्षा त्याच्या फळाकडे होणाऱ्या प्रगतीकडे वा त्या फळाच्या परिणामाकडे द्विगुणीत होत. ह्याचे दुष्परिणाम दोन. एक म्हणजे तो आपल्या प्रयत्नात कधीही पूर्णपणे एकरूप होवू शकत नाही आणि दुसरे म्हणजे दुष्परिणामाची चिंता त्याला आपल्या कर्मापासून मागे खेचते. मनाची ओढाताण होते.
महाभारतात गीता सांगण्याचे निमित्त हेच आहे. अर्जुनाला "आपण, आपल्या आप्तांची हत्या कशी करावी? मला पाप लागेल?" अशी चिंता भेडसावू लागली आणि त्याचे पर्यावसान त्याने आपले गांडीव जमिनीवर ठेवण्यात झाले. आता विचार केल्यास लक्षात येईल की अर्जुन हा, आपण आपल्या आप्तांची हत्या केली तर होणाऱ्या दुष्परिणामाचा (फळाचा) विचार करत होता. फळाची/प्रारब्धाची जबाबदारी स्वतःकडे घेत होता आणि त्यामुळे त्याची भरकट झाली. भगवंतांनी त्याला समजावले की "बाबा रे! युद्धभूमीत तुझ्यासमोर जो आहे तो तुझा शत्रू आहे आणि त्याला पराभूत करणे हे तुझे कर्म आहे. त्यांचा वध केल्यावर काय होईल हा विचार करणे तुझे काम नाही.तर तू तुझे काम कर आणि बाकीचे माझ्यावर सोड." आणि ह्याच्यातुन आपल्या धर्मग्रंथाचा जन्म झाला.
कर्मयोग: हा शब्द वाचायला मोठा भारदस्त वैगरे वाटतो पण तसे काही नाही. ह्याची सोप्पी व्याख्या समजावून घेऊ. ज्या कर्मामुळे आपल्या जीवाचा आपल्या आत्म्याशी योग/ओळख होण्यास मदत होते त्या कर्मास कर्मयोग म्हणतात. मी कर्ता आहे ह्या भावनेला तिलांजली देणे ह्यास श्रेयस उपासनेत कर्मयोग म्हटले आहे. एखादी गोष्ट मी केली किंवा माझ्यामुळे झाली असा विचार केल्यास,अहंकार वाढीस लागतो हे आपण अगोदरच अभ्यासिले आहे.पण त्याही पुढे जावून असे म्हणावे लागेल की ह्यातून स्पर्धा, मत्सर, घृणा असे विकार जन्माला येतात आणि आपल्याला शांत बसू देत नाहीत.त्यामुळे जे घडले ते प्रारब्ध आणि जे माझ्याकडून घडले त्यात मी फक्त निमित्त...... असे हे सोप्पे प्रमेय आहे.
प्रारब्ध नावाचे एक पूर्ण शास्त्र आध्यात्मात आहे. मोठे रंजक आहे. अर्थात आता त्याची चर्चा नको. पण त्यातील एक नियम मात्र सांगतो. प्रारब्धशास्त्रानुसार, नेहेमी एक जीव दुसऱ्या जीवाला त्याच्या कर्माची फळे द्यायला निमित्त होतो. आणि ही फळे जर मृत्यूसारखी भयानक असतील तर प्रसंगी निसर्ग हस्तक्षेप करतो.... ह्याचा अर्थ काय?
माझ्या पूर्वसुकृत कर्माचे फळ म्हणून मला सर्पदंश होणार असेल, तर मला, काळ त्या सर्पाजवळ घेऊन जाणारच आणि तिथॆ गेल्यावर आजूबाजूच्या ५० लोकाना सोडून सर्प मला चावणारच. दुसरे उदाहरण घेऊ. असे किती लोक असतील जे उत्तराखंडात जायची इच्छा धरून असतील पण ह्या वर्षी त्यांना ते जमल नसेल. ज्यांना जमले ते त्यांचे प्रारब्ध आणि त्यातूनही जे वाचले हे ही त्यांचे प्रारब्धच. इकडे फळ देण्यासाठी निसर्गाचा हस्तक्षेप आहे.
कर्मयोगात कर्तेपण ईश्वराकडे सोपवण्यावर खूप भर दिला आहे. म्हणून भगवान श्री कृष्णानी अर्जुनाला गीतेत सांगितले "निमित्तमात्रं भव सव्यसचिन"
आता प्रश्न असे पडतात की ही सर्व (प्रारब्धाची) व्यवस्था कोणी केली? त्यावर नियंत्रण कोणाचे? ती शक्ती मूर्त आहे का अमूर्त?आपल्या सर्वांना माहित आहे की ही भगवंताची लीला आहे. भगवंत नावाचे अमूर्त (निर्गुण) तत्व हे प्रारब्धाचे निर्माणकर्ते आणि नियंत आहे असे श्रेयस उपासना शिकवते. पण तो भगवंत जर निर्गुण आहे म्हणजे त्याला भौतिक अस्तित्व नाही त्यामुळे तो दिसत नाही आणि मग इथे आमचे परिवर्तनवादी मित्र किंवा शास्त्रज्ञ चेकाळतात. देव आहे का नाही असे वाद संवाद निर्माण होतात. "अरे माणूस चंद्रावर जावून पोहोचला अजूनही तुम्ही त्या चंद्राला तुमच्या पत्रिकेतून बाहेर काढत नाही, कसला आध्यात्म आणि कसला परमार्थ?" असे प्रश्न ही लोक मोठ्या अभिमानाने विचारतात.
विज्ञानाने अचाट प्रगती केली ह्यात वाद नाही. पण काही गोष्टी विज्ञान अजूनही स्पष्ट करू शकत नाही.
१) विज्ञानाने आजपर्यंत एका तांदुळाच्या अनेक जाती आणि प्रकार निर्माण केले पण ते तांदुळाचे मूळ बीज मात्र विज्ञान अजून बनवू शकले नाही
२) माणसाच्या jenes मध्ये प्रगती/हस्तक्षेप करून ठराविक स्वभावाची माणसे जन्माला घालणे आता विज्ञानामुळे सहज शक्य आहे, पण मूळात मानवाचा जन्म होण्यासाठी लागणारे पुबीज आणि स्त्रीबीज अजून विज्ञान बनवू शकले नाही
३) आजकाल शरीरातील अवयवांची अदलाबदली (transplant ) ही फार मोठी बाब राहिलेली नाही. पण म्हणून विज्ञान अजून, स्वतंत्र असा मानवाचा कोणताही अवयव प्रयोगशाळेत बनवण्यात यशस्वी झालेले नाही.
असे बरेच प्रश्न आहेत आणि ह्याची उत्तरे शोधताना आपली बुद्धी थकून जाते, कुंठीत होते, लक्षात ठेवा जेव्हा बुद्धी थकून जाते त्याच्यापुढचा सगळा प्रांत हा श्रद्धेचा असतो. आणि हीच निष्काम उपासना.
ज्ञानेश्वर माउलीचा एक अप्रतिम अभंग सांगून इथे थांबूया
'तैसे आपुले विहिता, उपायो असे न विसंबिता
ऐसा कीजे की जगन्नाथा, आभारु पडे
म्हणजे,, आपल्या कडून अपेक्षित असलेले कर्म इतक्या उत्तमरित्या करावे की त्या कर्माच्या उपकाराचे ओझे भगवंताच्या मस्तकावर चढावे. काय दिव्य कल्पना आहे ही.......................
लेख सौजन्य : राहुल पिकळे