गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

पितृपक्ष (महालय पक्ष)

|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तसेच पुराणातील ग्रंथांमध्ये देखिल पितृपक्षाला फार महत्त आहे. अगदी श्रीपाद चरित्रात देखिल याचा उल्लेख आहे व ते योग्य शास्त्रोक्त पद्धतीने केले नसता त्याच्या दोष पुढील तीन पिढ्यांना लागतो हे लक्षात घेतले पाहिजे.   जोतिषशास्त्र केवळ १२ राशी २७ नक्षत्रात अभ्यास नाही तर त्यामध्ये अनुभव आणि प्रचीती याची देखिल सांगड असते. कृष्णामूर्ती पद्धतीत ज्यावेळी उत्तर अथवा कालनिर्णय चुकतात त्यावेळी अशाकाही कुंडल्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की यामध्ये पितृदोष आहे.  त्याचे परिणाम म्हणजे विवाहात अडचणी, संतती सुख, व्यापारातील नुकसान इत्यादी अनेक असू शकतात. मागील  "मोक्षम् देही राहू" या लेखात आम्ही हा दोष पत्रिकेत कसा शोधातात हे दर्शविले होते. ती केवळ एक कुंडली नसून अशा कुंडल्यांचा संच आम्हा जवळ आहे.  याचे महत्त्व आपण जाणावे यासाठी लेखनाचा आमचा हा प्रयत्न.  त्यामुळे येणाऱ्या पितृपक्षात आपण ही विधी निश्चीतपणे विधीपूर्वक करावी आणि आपल्या पितरांना सदगती मिळवून द्यावी. याची सखोल माहित व विधी पद्धती ही सनातन ग्रंथातून पुढील प्रमाणे मांडली आहे. 
(टीप:- दिवाळी अंकासाठी राशी भविष्य लिखाणाचे कार्य सुरु असल्याने कुंडली विवेचने लेख आम्ही नोव्हेंबर पासून वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार आहोत).
आपला, 
दिपक पिंपळे

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.
  १. पक्ष
         भाद्रपद मासातील कृष्णपक्ष
 २. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व
       पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त राहतात.
 ३. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?
अ. `पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्‍या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.
आ. पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.
इ. पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.
ई. पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते. 
 ४. श्राद्ध करण्याची पद्धत
अ. भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रयी - पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा); मातृत्रयी - माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
आ. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.
इ. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण सांगावेत.
ई. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यावद्वृश्चिकदर्शनम्म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.
उ. पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.

तिथी
श्राद्धाचे नाव
कोणासाठी ?
विधीविशेष
१. चतुर्थी किंवा पंचमी (भरणी नक्षत्र असतांना)
भरणी
मृत झालेली -
व्यक्ती

२. नवमी
अविधवा नवमी
अहेवपणी मृत झालेली स्त्री
श्राद्ध न करता सवाष्णीला भोजनही लतात
३. त्रयोदशी
बाळाभोळानी तेरस (सौराष्ट्रातील नाव)
लहान मुले
काकबळी
४. चतुर्दशी
घातचतुर्दशी
अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेले


टीप १ - पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्‍या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते. (मूळस्थानी)
 ५. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व
         दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा.
६. पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?
अ. पक्षपंधरवडा कालावधी
         भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या) महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.
 आ. विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे
         पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात विवाहहा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर राहातात. प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही. पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्‍या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.
७. भरणी श्राद्ध
अ. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे
         पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते, यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.
 आ. भरणी श्राद्ध करण्याचा काल
         पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्‍यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये.
 ८. इतरही मघादी श्राद्ध
भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्‍या वर्षापासून करावीत.
 ९. नित्य तर्पण
         नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.
 संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ सण, धार्मिक उत्सव आणि व्रते


शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

योगउपासक बाबा रामदेव (कुंडली विवेचन)



||श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

आज योग उपासक बाबा रामदेव यांच्या कुंडलीचा अभ्यास करणार आहोत. एका साधू-संन्याशी व्यक्तीतमध्ये ग्रह कसे कार्य करतात हे अभ्यासनीय आहे. के.पी व ४-स्टेप थेरी च्या माध्यमातून नियम कसे चपखल बसतात व अशा कुंडलीत केपीचे कुठले नियम वापरतात हा उद्धेश आहे. जन्मवेळ व लग्नशुद्धी ही केपी अभ्यासक श्री पुनीतजी पांडे यांनी केली आहे तर या कुंडलीत नियम हे गुरुवर्य श्री चंद्रकांत भट्ट याच्या नियमावली मधील आहे.




Preview




शुक्रवार, २८ जून, २०१३

"कर्मयोग"


श्री स्वामी समर्थ 
सर्व गुरु बंधू आणि गुरु भगिनीनो, सादर प्रणाम 

काल आपण प्रारब्ध हा विषय हाताळायचा प्रयत्न केला. आज कर्मयोग आणि त्याचे प्रारब्धाशी असेलेले अतूट नाते समजून घ्यायचा प्रयत्न करू या. 

विषयाला हात घालण्यापूर्वी, कर्म आणि कर्मयोग म्हणजे काय हे पहावे लागेल.(प्रारब्ध म्हणजे काय हे कालच पाहिले आहे.). 

कर्म:आपण जी दैनंदिन कामे (स्वतः साठी आणि दुसऱ्या साठी) करतो ती सर्व कर्म ह्या गटात मोडतात. ही कर्मे बरीच प्रकारची असू शकतात, एक तर स्वेच्छेने केलेली आणि अनिच्छेने केलेली अशी त्यांची वर्गवारी करता येईल. आणि खोलात गेल्यास, काल बघितल्याप्रमाणे, देहकर्म, व्यवसायकर्म, कर्तव्यकर्म, धर्मकर्म आणि अध्यात्मकर्म असे त्याचे पोटभाग करता येतील. आता, फळाची अपेक्षा न धरता कर्म करा असे परमार्थ सांगतो, 
पण खरेच ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताला शक्य आहे का? उत्तर आहे, हो पण आणि नाही पण. त्याचे स्पष्टीकरण म्हणजे, आपण करत असलेली काही कर्मे आपण निश्चितच काही अपेक्षा न ठेवता करू शकतो. उदाहरणार्थ, आईवडीलांची सेवा, मुलांचे संगोपन इत्यादी. ह्यात प्रकर्षाने स्वामी नामस्मरण लिहिणे टाळतो आहे कारण बहुतौशी नामस्मरण हे अपेक्षा ठेऊनच केले जाते. वरवर आपली स्वामीभक्ती हे त्याचे मुख्य कारण असते ह्यात वाद नाही, पण मनात एक सुप्त अपेक्षा असते की मी एवढे स्वामी नामस्मरण करतो मग मला स्वामी त्याचे उचित फळ देवोत. आणि ते मिळाले नाही आणि संकटाचा डोलारा वाढत गेला की विश्वास डगमगू लागतो. स्वामी का माझ्याकडे लक्ष देत नाहीत, का माझी ह्यातून सुटका होत नाही, असा विचार करून मन खट्टू होते. "महाराजा! काय रे पाप केले मी,,, जे तू मला हे दिवस दाखवतो आहेस?" असे विचार येतात. ह्या सर्वांचे मूळ नामस्मरणामागची सुप्त अपेक्षाच असते. माझ्यासारखा भक्त हे चारचौघात कबुल करणार नाही पण माझे सत्य मी माझ्यापासून लपवून ठेऊ शकत नाही. 

असो! तर काही कर्मे पूर्णपणे अपेक्षारहित असू शकतात आणि काही अपेक्षापूर्ण. आणि त्यात गैर असे काही नाही. काल सांगितल्याप्रमाणे व्यवसायकर्म (नौकरी) करताना पगाराची अपेक्षा नाही ठेवली तर उपाशी मरायची पाळी येईल. देहकर्म, व्यायाम करताना, शरीर निरोगी राहिले पाहिजे ही अपेक्षा असणे चुकीचे नाही. पण उरलेली तीन कर्मे नक्कीच अपेक्षाविरहित असू शकतात किंवा तसा प्रयत्न करण्यास काहीच हरकत नाही. 

जेव्हा फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जाते तेव्हा साधकाचे लक्ष आपल्या कर्मापेक्षा त्याच्या फळाकडे होणाऱ्या प्रगतीकडे वा त्या फळाच्या परिणामाकडे द्विगुणीत होत. ह्याचे दुष्परिणाम दोन. एक म्हणजे तो आपल्या प्रयत्नात कधीही पूर्णपणे एकरूप होवू शकत नाही आणि दुसरे म्हणजे दुष्परिणामाची चिंता त्याला आपल्या कर्मापासून मागे खेचते. मनाची ओढाताण होते. 

महाभारतात गीता सांगण्याचे निमित्त हेच आहे. अर्जुनाला "आपण, आपल्या आप्तांची हत्या कशी करावी? मला पाप लागेल?" अशी चिंता भेडसावू लागली आणि त्याचे पर्यावसान त्याने आपले गांडीव जमिनीवर ठेवण्यात झाले. आता विचार केल्यास लक्षात येईल की अर्जुन हा, आपण आपल्या आप्तांची हत्या केली तर होणाऱ्या दुष्परिणामाचा (फळाचा) विचार करत होता. फळाची/प्रारब्धाची जबाबदारी स्वतःकडे घेत होता आणि त्यामुळे त्याची भरकट झाली. भगवंतांनी त्याला समजावले की "बाबा रे! युद्धभूमीत तुझ्यासमोर जो आहे तो तुझा शत्रू आहे आणि त्याला पराभूत करणे हे तुझे कर्म आहे. त्यांचा वध केल्यावर काय होईल हा विचार करणे तुझे काम नाही.तर तू तुझे काम कर आणि बाकीचे माझ्यावर सोड." आणि ह्याच्यातुन आपल्या धर्मग्रंथाचा जन्म झाला.

कर्मयोग: हा शब्द वाचायला मोठा भारदस्त वैगरे वाटतो पण तसे काही नाही. ह्याची सोप्पी व्याख्या समजावून घेऊ. ज्या कर्मामुळे आपल्या जीवाचा आपल्या आत्म्याशी योग/ओळख होण्यास मदत होते त्या कर्मास कर्मयोग म्हणतात. मी कर्ता आहे ह्या भावनेला तिलांजली देणे ह्यास श्रेयस उपासनेत कर्मयोग म्हटले आहे. एखादी गोष्ट मी केली किंवा माझ्यामुळे झाली असा विचार केल्यास,अहंकार वाढीस लागतो हे आपण अगोदरच अभ्यासिले आहे.पण त्याही पुढे जावून असे म्हणावे लागेल की ह्यातून स्पर्धा, मत्सर, घृणा असे विकार जन्माला येतात आणि आपल्याला शांत बसू देत नाहीत.त्यामुळे जे घडले ते प्रारब्ध आणि जे माझ्याकडून घडले त्यात मी फक्त निमित्त...... असे हे सोप्पे प्रमेय आहे. 

प्रारब्ध नावाचे एक पूर्ण शास्त्र आध्यात्मात आहे. मोठे रंजक आहे. अर्थात आता त्याची चर्चा नको. पण त्यातील एक नियम मात्र सांगतो. प्रारब्धशास्त्रानुसार, नेहेमी एक जीव दुसऱ्या जीवाला त्याच्या कर्माची फळे द्यायला निमित्त होतो. आणि ही फळे जर मृत्यूसारखी भयानक असतील तर प्रसंगी निसर्ग हस्तक्षेप करतो.... ह्याचा अर्थ काय?

माझ्या पूर्वसुकृत कर्माचे फळ म्हणून मला सर्पदंश होणार असेल, तर मला, काळ त्या सर्पाजवळ घेऊन जाणारच आणि तिथॆ गेल्यावर आजूबाजूच्या ५० लोकाना सोडून सर्प मला चावणारच. दुसरे उदाहरण घेऊ. असे किती लोक असतील जे उत्तराखंडात जायची इच्छा धरून असतील पण ह्या वर्षी त्यांना ते जमल नसेल. ज्यांना जमले ते त्यांचे प्रारब्ध आणि त्यातूनही जे वाचले हे ही त्यांचे प्रारब्धच. इकडे फळ देण्यासाठी निसर्गाचा हस्तक्षेप आहे. 
कर्मयोगात कर्तेपण ईश्वराकडे सोपवण्यावर खूप भर दिला आहे. म्हणून भगवान श्री कृष्णानी अर्जुनाला गीतेत सांगितले "निमित्तमात्रं भव सव्यसचिन"

आता प्रश्न असे पडतात की ही सर्व (प्रारब्धाची) व्यवस्था कोणी केली? त्यावर नियंत्रण कोणाचे? ती शक्ती मूर्त आहे का अमूर्त?आपल्या सर्वांना माहित आहे की ही भगवंताची लीला आहे. भगवंत नावाचे अमूर्त (निर्गुण) तत्व हे प्रारब्धाचे निर्माणकर्ते आणि नियंत आहे असे श्रेयस उपासना शिकवते. पण तो भगवंत जर निर्गुण आहे म्हणजे त्याला भौतिक अस्तित्व नाही त्यामुळे तो दिसत नाही आणि मग इथे आमचे परिवर्तनवादी मित्र किंवा शास्त्रज्ञ चेकाळतात. देव आहे का नाही असे वाद संवाद निर्माण होतात. "अरे माणूस चंद्रावर जावून पोहोचला अजूनही तुम्ही त्या चंद्राला तुमच्या पत्रिकेतून बाहेर काढत नाही, कसला आध्यात्म आणि कसला परमार्थ?" असे प्रश्न ही लोक मोठ्या अभिमानाने विचारतात. 

विज्ञानाने अचाट प्रगती केली ह्यात वाद नाही. पण काही गोष्टी विज्ञान अजूनही स्पष्ट करू शकत नाही. 

१) विज्ञानाने आजपर्यंत एका तांदुळाच्या अनेक जाती आणि प्रकार निर्माण केले पण ते तांदुळाचे मूळ बीज मात्र विज्ञान अजून बनवू शकले नाही
२) माणसाच्या jenes मध्ये प्रगती/हस्तक्षेप करून ठराविक स्वभावाची माणसे जन्माला घालणे आता विज्ञानामुळे सहज शक्य आहे, पण मूळात मानवाचा जन्म होण्यासाठी लागणारे पुबीज आणि स्त्रीबीज अजून विज्ञान बनवू शकले नाही 
३) आजकाल शरीरातील अवयवांची अदलाबदली (transplant ) ही फार मोठी बाब राहिलेली नाही. पण म्हणून विज्ञान अजून, स्वतंत्र असा मानवाचा कोणताही अवयव प्रयोगशाळेत बनवण्यात यशस्वी झालेले नाही.

असे बरेच प्रश्न आहेत आणि ह्याची उत्तरे शोधताना आपली बुद्धी थकून जाते, कुंठीत होते, लक्षात ठेवा जेव्हा बुद्धी थकून जाते त्याच्यापुढचा सगळा प्रांत हा श्रद्धेचा असतो. आणि हीच निष्काम उपासना. 

ज्ञानेश्वर माउलीचा एक अप्रतिम अभंग सांगून इथे थांबूया 

'तैसे आपुले विहिता, उपायो असे न विसंबिता
ऐसा कीजे की जगन्नाथा, आभारु पडे

म्हणजे,, आपल्या कडून अपेक्षित असलेले कर्म इतक्या उत्तमरित्या करावे की त्या कर्माच्या उपकाराचे ओझे भगवंताच्या मस्तकावर चढावे. काय दिव्य कल्पना आहे ही.......................

लेख सौजन्य : राहुल पिकळे

शनिवार, २२ जून, २०१३

"प्रारब्ध"


श्री स्वामी समर्थ 

आपण आज विषय समजावून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो विषय म्हणजे "प्रारब्ध" 
आता बघुया..........श्रेयस उपासना प्रारब्धाबद्दल काय म्हणते? काय शिकवते? जे काही मी अभ्यासायचा प्रयत्न केला तो मांडतोय 

शास्त्रज्ञ/वैज्ञानिक, हे प्रारब्ध शब्द ऐकला की फार चिडतात. जणू ह्या शब्दाशी त्यांचे जन्मोजन्मांतरीचे वैर असावे. कारण विज्ञान, प्रारब्ध मानत नाही आणि आध्यात्म प्रारब्धाखेरीज दुसरे काही मानत नाही. विज्ञानाने प्रारब्धाला Destiny /predestination किंवा Fate अशी नाव देवून त्याला निकालात काढले, त्यांच्या मते, नैराश्य, नाकर्तेपणा, आपला कमकुवतपणा वैगरे लपवण्याचे एक ठिगळ म्हणजे प्रारब्ध, पण आध्यात्मात प्रारब्धाला खूप महत्व आहे. आपल्या व्यावहारिक भाषेत आपण त्याला नशीब, भोग, काळ, अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखतो. विज्ञान आणि आध्यात्मातला हा वाद, आध्यात्म कसा संपवतो ते नंतर तपासू. आता मुद्याला येऊ..........

"जर ५ मिनिटे उशीर झाला असता, तर मी तुला दिसलो नसतो", "काय नशीब बघ, ही संधी, जणू मी येण्याची वाटच बघत होती", "अरे आणि काय करू सांग, साला! माझ नशीबच फुटक", "काय कराव सुचत नाही? काय नशिबात लिहून ठेवलय, त्या देवासच ठाऊक?" " मरू दे! तू आणि तुझ नशीब, जे नशिबात लिहिले आहे तेच होईल" अशी आणि ह्या अर्थाची बरीच वाक्ये आपण आसपास ऐकतो किंवा प्रसंगी स्वतःही वापरतो. ही आणि अशी सर्व वाक्ये ही "प्रारब्ध" ह्या तत्वाकडे बोट दाखवतात.

"अवघियांचे अवघे सजे, तरी अवघे होती राजे " असे दासबोधात समर्थांनी लिहिले आहे. ह्याचा अर्थ जर सगळ्यांच्या सगळ्या इच्छा/मनीषा पूर्ण झाल्या असत्या तर सगळेच राजे झाले असते. पण तसे होत नाही. असा एकही माणूस भेटत नाही ज्याने जो विचार केला, ठरवले अगदी तसेच आणी तसेच झाले. हेच प्रारब्ध..............

प्रारब्ध समजून घ्यायचे असेल तर थोडे कर्माबद्दल समजून घ्यावे लागेल. आणि ते खालील प्रमाणे.

आपण रोजच्या आयुष्यात जी जी कामे करतो, चांगली वाईट त्यासर्व कामाना/क्रियेला कर्म म्हणतात हे आपल्याला सर्वाना माहित आहेच . आता ही कर्मे मूलतः तीन प्रकारात येतात.

१) संचित कर्म : आपण गेल्या अनेक जन्मात केलेली अनेक चांगली वाईट कर्मे ह्या कर्मात मोडतात.
२) प्रारब्ध कर्म : आपण पूर्वजन्मी केलेल्या आणि ह्या जन्मी करतोय ती सर्व ह्यात येतात. थोडक्यात कर्माच्या संचितात आपण सद्य परिस्थितीत जी भर घालतो ते प्रारब्ध कर्म. 
३) आगामी कर्म : जी कर्मे आपण आज करतो आहोत ज्याचे फळ आपणास भविष्यात मिळणार आहे ती सर्व कर्म ह्या भागात येतात. 

एक विसरू नका, मानव जन्म मिळणे हेच एका बलदंड संचित कर्माचे प्रतिक आहे. आणि हा जन्म खरोखरच अनमोल आहे कारण त्यामुळे आपणास स्वामिसेवा करण्याचे भाग्य लाभले. अर्थात आपण करत असलेली स्वामिसेवा हे आपल्या आगामी कर्मात येत. 

आता हे समजल्यावर, आणि थोडे खोलात जावू, ढोबळ मानाने आपण सध्या करत असलेल्या कर्मांचा विचार केल्यास त्यांचेही ३ प्रकार करता येतील 

१) इच्छा : ह्या कर्मात, आपण स्वतःच्या मर्जीने/आवडीने हे कर्म करतो. 
२) अनिच्छा: ह्यात आपण स्वतःच्या मर्जीने किंवा संमतीने हे कर्म करत नाही. नाइलाजाने, जबरदस्तीने, कंटाळून केलेले कर्म ह्यात येतात.
३) परेच्छा : ह्यातील कर्म आपण दुसऱ्याच्या इच्छेने करतो. कदाचित दुसरे खुश व्हावे म्हणून, दुसरे काय म्हणतील म्हणून, केलेली कर्मे ह्यात येतात. 

अजून थोडे खोलात गेल्यावर आपल्याला कर्म करण्याची आपली माध्यमेसुद्धा कळतील,
१) मानसा 
२) वाचा 
३) कर्मणा 
पण त्याची चर्चा पुन्हा कधीतरी

आपल्या व्यावहारिक भाषेत सांगायचे झाले तर देह्कर्म, व्यवसायकर्म, कर्तव्यकर्म, धर्मकर्म आणि आध्यात्मकर्म असे कर्माचे भाग करता येतील. कर्म करताना त्याच्या फळाविषयी विचार येणे अगदी नैसर्गिक आहे, पण तोच विचार बाजूला ठेऊन अपार प्रयत्न करून आपले कर्म पार पाडावे असे आध्यात्म सांगते. फळावर नजर ठेऊन केलेले कर्म हे कधीही कर्मनिष्ठ होवू शकत नाही. 
आजकालच्या जगामध्ये हे पूर्णपणे शक्य नाही, म्हणजे व्यवसाय कर्मात फळाची (पगार, प्रमोशन, आर्थिक फायदा) ह्याचा सारासार विचार करावाच लागतो, पण हे सर्व प्रकारच्या कर्मांना लागू नाही.
आपण स्वामींचा जप करतो, का करतो हे प्रत्येकाने स्वतःला विचारावे, उत्तर मिळेल. म्हणून संकटात असताना जप केला आणि परिस्थिती सुधारली नाही की विश्वास डगमगायला लागतो, मन खट्टू होते, त्याचे हेच कारण. की आपण स्वामीभक्त, आपल्या संकटकाळी आपण त्यांची आराधना केली म्हणजे त्यांनी माझी त्वरीत त्यातून सुटका केली पाहिजे हे फळ त्या नामस्मरणातून अपेक्षित असते. पण ही अपेक्षाच (फळ) नसेल तर अशी परिस्थितीच उद्भवणार नाही. आणि निष्काम भक्ती करता येईल.

आपण केलेल्या ह्या वेगवेगळ्या कर्मांची फळ आपल्या संचितात जमा होत असतात आणि त्याच्या परिणामाला प्रारब्ध असे म्हणतात. हे कोणालाही चुकत नाही आणि कोणाही ते चुकवू शकत नाही . असे म्हणतात की वेगवेगळ्या ९९ योनीतून (जन्मातून) गेल्यावर जीवात्म्याला मनुष्य जन्म मिळतो. आणि त्या जन्मानंतर दोन वाटा असतात एक मोक्षाची आणि एक परत जन्ममृत्युच्या फेऱ्यात परत अडकायची.............

आता असे म्हटल्यावर, काही प्रश्न मनात येतात, 

जर माझे प्रारब्ध अगोदरच ठरले आहे तर मग माझ्या हातात काय उरते? 
जर हे सगळे पूर्वनियोजित आहे तर मी कशाला कसले प्रयत्न करायचे? जे होणार ते होणारच. "असेल माझा हरी, तर देईल मला खाटल्यावरी" असे विचारही थैमान घालतात. 

जर वरचा मजकूर नीट अभ्यासला तर लक्षात येईल की जे होते आहे ते आपल्या पूर्वकर्माचे फळ आहे आणि त्यापुढे जे होणार आहे ते माझ्या आजच्या कर्माचे फळ असणार आहे. मग आज मला हातावर हात घेऊन बसणे कसे चालेल?

आपल्या संचितात जमा झालेली नासकी फळे ही आपल्याला, चांगली कर्मे करून कमी करता येतात. म्हणून मानवाला देव ओळखण्याचे/भजण्याचे अचाट सामर्थ्य भगवंताने दिले आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपले संचित शुध्द करणे हे ज्याच्यात्याच्या हातात असते. 

आता प्रारब्धावर विश्वास न ठेवणाऱ्या परिवर्तनवादी वैज्ञानिकांबद्दल थोडेसे बोलू या. त्यांचे असे मत असते की जे काही घडते आणि घडणार आहे आणि जे घडून गेले, त्याला ठराविक असा शास्त्रीय प्रमाद किंवा कारण असते. उदाहरणे घेऊन, आध्यात्म ह्या वादाला कसे झुकवतो ते पाहुया 


१) सध्या उत्तराखंडात किती माणसे दगावली हे सर्वांना ज्ञात आहेच. आता ही माणसे का दगावली? तर पूर आला म्हणून, मग पूर का आला?तर पावसाळा आहे, थोडा हवामानात बदल झाला इत्यादी, इत्यादी आणि पूर आला. पाण्याची पातळी एवढी वाढली आणि त्यात माणसे वाहून गेली किंवा दगावली. अशी कारणे कोणताही २० व्या शतकातील शास्त्रज्ञ देईल. पण मग ह्यावर फक्त दोनच प्रश्न, १) पूर उत्तराखंडातच का आला? २) आणि फक्त एवढीच माणसे का दगावली, बरीच माणसे ह्यातून वाचली सुद्धा? मग असे का? उत्तर एकच ................................. प्रारब्ध 
२) एड्स हा महाभयंकर रोग आज सर्व जगात थैमान घालतोय. हा एड्स माकडातून आला असे म्हणतात. मग माकडे हे तर आपले पूर्वज, त्यांच्यात आत्ताच तो रोग कुठून उत्पन्न झाला? आणि जर अगोदरपासून असेल तर आताच २० व्या शतकात का पसरला? उत्तर एकच ................................... प्रारब्ध 
३) एकाच आईच्या पोटी आलेली मुले/ भावंडे अतिशय भिन्न स्वभावाची निघतात, तर विज्ञान म्हणते, त्यांच्या जन्माच्या वेळी असेलेले त्यांचे metabolism ह्यास कारणीभूत असते. मग असे असेल तर जुळ्या मुलांच्या बाबतीतही असे का होते? उत्तर एकच...................................... प्रारब्ध 

म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात 
जैशी स्थिती आहे, तैश्यापारी राहे 
कौतुक तू पाहे संचिताचे 

तर समर्थ रामदास स्वामी सुचवतात 

काही गलबला, काही निव्वळ 
असा कंठीत जावा काळ 

लेख सौजन्य : श्री राहुल पिकळे